दिल्ली व पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी 'सारथी' ने दरवर्षी जवळपास 500 विद्यार्थ्यांना निशुल्क प्रशिक्षण, आकस्मिक खर्च आणि विद्यावेतनाचा लाभ मिळत आहे. या योजनेद्वारे मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या विकासासाठी 'सारथी' संस्थेच्या अंतर्गत प्रयत्न केले जात आहेत.
'शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती' हे संकल्पवाक्य घेवून स्थापन झालेल्या 'सारथी' संस्थेद्वारे विविध कल्याणकारी उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी मिळणारे निशुल्क प्रशिक्षण होय.
'सारथी'च्या या योजनेअंतर्गत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजातील उमेदवारांना केंद्रीय नागरी सेवेतील प्रशासकीय पदावर प्रवेश मिळण्यासाठी 'युपीएससी' मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेचे निशुल्क प्रशिक्षण दिले जाते. यासाठी पुणे येथील तीन आणि दिल्ली येथील दोन असे एकूण पाच प्रशिक्षण संस्थांची निवड करण्यात आली आहे.
दरवर्षी झालेल्या चाचणी परीक्षा आणि कागदपत्रांची पडताळणी यांनंतर एकूण 500 उमेदवारांची निवड करण्यात येते. या उमेदवारांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्प्यांसाठी 'सारथी'मार्फत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना पुणे व दिल्लीतील वास्तव्यासाठी वेगवेगळ्या रकमा मासिक विद्यावेतन म्हणून दिल्या जातात. सोबतच आकस्मिक खर्च व पूर्वपरीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी एकरकमी रक्कमही दिली जाते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी लागू आहेत. उमेदवार महाराष्ट्रातील मराठा, कुणबी आदी समाजातील 21 ते 32 वयोगटातील असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याच्या दिवशी उमेदवारांकडे कोणत्याही शाखेची पदवी असावी. तसेच इतर कोणत्याही शासकीय किंवा खाजगी संस्थेकडून याच प्रकारचा लाभ घेतलेला नसावा.
उमेदवारी अर्जासोबत सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्राप्त जातीचा व उत्पन्नाचा दाखला तसेच नॉनक्रीमिलेअर प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. 'सारथी'ने जाहिरात प्रसिद्ध करून मागविलेल्या ऑनलाईन अर्जांवरून पहिल्या टप्प्यात 'सीईटी' चाचणी परीक्षा घेतली जाते. यातील गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यानंतर कागदपत्रे पडताळून अंतिम निवड केली जाते.
गेल्या तीन वर्षांत 'सारथी'चे हे प्रयत्न यशस्वी ठरल्याचे दिसून येते. 2020 ते 2022 या कालावधीत संस्थेद्वारे दिलेल्या प्रशिक्षणातून 12 उमेदवार भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) तर 18 उमेदवार भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) निवडले गेले आहेत. इतर केंद्रीय सेवांमध्येही अनेक मराठा समाजातील तरुणांना संधी मिळाली आहे.
'सारथी' संस्थेच्या या मोफत प्रशिक्षण योजनेद्वारे मराठा समाजातील अनेक तरुणांना केंद्रीय नागरी सेवांमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोर्टलवरील तपशिलानुसार अर्ज करता येतात. जास्तीत जास्त मराठा तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि प्रशासकीय क्षेत्रात आपली कामगिरी दाखवावी अशी अपेक्षा आहे.

0 टिप्पण्या