मुलीचे शिक्षण, आरोग्य आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य गुंतवणूक
आपल्या मुलीचे संरक्षण, शिक्षण आणि भविष्य सुरक्षित करणे ही प्रत्येक पालकांची महत्त्वाकांक्षा असते. भारत सरकारने या उद्देशाने अनेक उपक्रम आणि योजना सुरू केल्या आहेत. याच उद्देशाने महिला सन्मान बचत पत्र आणि सुकन्या समृद्धी योजना या दोन महत्त्वपूर्ण योजना शासनामार्फत राबविल्या जात आहेत.
महिला सन्मान बचत पत्र योजना
महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत महिला पोस्ट ऑफिसात बचत खाते उघडू शकतात. या बचत खात्यात १ हजार रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येऊ शकते. महिलांनी या बचत खात्यात २ लाख रुपये जमा केल्यानंतर संबंधित महिलेला दोन वर्षांनंतर २ लाख ३२ हजार रुपये मिळतील. या योजनेच्या लाभासाठी केवळ काही कागदपत्रांची आवश्यकता असते.
या योजनेत किमान एक हजार रुपयांपासून कमाल २ लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. महिला व मुलीच्या नावावर प्रत्येकी २ लाखापर्यंत बचत पत्रे घेता येतील. या योजनेमधील गुंतवणुकीसाठी व्याजदर ७.५ टक्के तिमाही चक्रवाढ पद्धतीने असून एका वर्षानंतर ४० टक्के रक्कम काढण्याची सोय आहे. या योजनेतून घेतलेल्या बचत पत्रांची मुदत दोन वर्षाची आहे.
उदाहरणार्थ, १ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास मुदतीअंती १ हजार १६० रुपये मिळतील, तर २ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास मुदतीअंती २ लाख ३२ हजार ४४ रुपये मिळतील. ही योजना फक्त महिलांसाठी आहे आणि त्यांच्या मुलींच्या नावावरही बचत पत्रे घेता येतील.
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या शिक्षण, आरोग्य, लग्न आणि उज्ज्वल भविष्यासाठी राबविली जाणारी एक फायदेशीर बचत योजना आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर ८ टक्के व्याजदर असून चक्रवाढ दराने व्याजाची आकारणी केली जाते. मुलीच्या जन्मापासून ते १० वर्षापर्यंत तिच्या नावावर खाते उघडता येते.
खाते उघडल्यापासून १५ वर्षापर्यंत प्रत्येक वर्षी किमान २५० रुपये ते कमाल १ लाख ५० हजाराची गुंतवणूक करता येते. उदाहरणार्थ, प्रत्येक महिन्याला १००० रुपये गुंतविल्यास मुदतीअंती ५ लाख ३९ हजार ४५३ रुपये मिळतील. या योजनेतील गुंतवणूकीवर आयकरातून सूट मिळते.
या दोन्ही योजनांमुळे महिला आणि मुलींची आर्थिक स्थिती सुदृढ होण्यास मदत होईल. त्याचबरोबर मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि लग्नासारख्या महत्त्वाच्या गरजांची पूर्तता होईल. त्यामुळे या योजनांचा लाभ घेऊन आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करावे. अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा.

0 टिप्पण्या